भविष्यातील धोके टाळण्यासाठी भावनांची सजगता विकसित करणे गरजेचे – डॉ. यश वेलणकर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आजच्या नवीन पिढीला अनेक मानसिक आणि शारीरिक समस्यांनी ग्रासलेले आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर मनस्थितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भावनांची सजगता विकसित करणे आणि त्यासाठीची तंत्रे मुलांना आणि शिकवणे हे शिक्षकांचे आणि पालकांचे महत्त्वाचे काम आहे असे मत सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. यश वेलणकर यांनी व्यक्त केले.

१७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत शिक्षक आणि पालकांसाठी डॉ.यश वेलणकर यांच्या जीवनोत्सव या विषयावर ‘ग्रंथाली’, मुंबई आणि केसीई सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालय, शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या वतीने शिक्षकांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. आपल्याला चांगल्या वाईट भावनांचे संयोजन करता आले पाहिजे. योग्य- अयोग्य बाबी ठरवतांना विवेक जागृत ठेवणे आवश्यक आहे. ‘विचार येणे’ आणि ‘विचार करणे’ या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत; यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. मुलांची मनस्थिती समजून घेण्यासाठी त्यांना उपदेश करण्याऐवजी त्यांचे कौतुक केले पाहिजे. त्यामुळे त्यांच्याशी अधिक चांगल्या पद्धतीने संवाद साधता येऊ शकतो. असेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपल्याला जर मानसिक आणि शारीरिक विकारांवर मात करायची असेल तर त्यासाठी काही तंत्रे अवगत केली पाहिजे. त्यामध्ये मनस्थितीकडे लक्ष देणे, शरीराकडे लक्ष देणे, विचार आणि मनस्थितीमध्ये बदल घडवून आणणे; या तंत्रांचा अवलंब आपण केला पाहिजे. त्यामुळे आपोआपच आपले मानसिक स्वास्थ्य अधिक सुदृढ होईल असेही त्यांनी सांगितले. अलीकडे मुलांमध्ये द्वेषभावना आणि आक्रस्ताळेपणा वाढतो आहे, अशावेळी मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करणे आणि समाज माध्यमे आणि मोबाईलचा वापर कमी करण्यास सांगणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक राणे होते. यावेळी बोलताना त्यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी कशापद्धतीने वर्तन केले पाहिजे. अध्ययन-अध्यापनामध्ये मानसिकता भावनिकता या बाबी किती महत्त्वाच्या आहेत याचे महत्त्व त्यांनी सांगितले. व्यासपीठावर केसीई सोसायटीचे सचिव अॅड. प्रमोद पाटील, प्रशासकीय अधिकारी, शशिकांत वडोदकर, मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेत विविध शाळा आणि महाविद्यालयातील १६० शिक्षक, पालक सहभागी झाले होते. कार्यशाळेत शिक्षकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन डॉ यश वेलणकर यांनी केले. दुपारच्या सत्रात सर्वांसाठी खुला असलेल्या मानसिक स्वास्थ्य व जीवनशैली या विषयावर डॉ. यश वेलणकर व डॉ.मयूर मुठे यांनी मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवी स्वास्थ्य बिघडत आहे त्याचा परिणाम एकूणच समाजजीवनावर होत आहे. त्यातून मार्ग काढायचा असेल तर आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे असे मत डॉ. यश वेलणकर यांनी व्यक्त केले. तर डॉ. मयूर मुठे यांनी समाजात वाढत चाललेली विघातक प्रवृती नकारात्मक परिणाम करते आहे त्यामुळे सर्वांनाच नवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मनाची अस्वस्थता वाढली की त्याचा परिणाम शरीर स्वास्थ्यावर होतो हे टाळायचे असेल तर प्रत्येकाने आपली दैनंदिन जीवनशैलीचे योग्यप्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे असे सांगीतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.सी.ई.सोसायटी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, डॉ. हर्षवर्धन जावळे, कोषाध्यक्ष श्री. डी.टी.पाटील, सचिव अॅड. प्रमोद पाटील, सहसचिव अॅड. प्रविणचंद्र जंगले, प्रशासकीय अधिकारी श्री.शशिकांत वडोदकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जळगाव शहरातील नामवंत डॉक्टर्स तसेच शहरातील मान्यवर नागरिक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा.योगेश महाले यांनी मानले.

Protected Content