डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन

जळगाव, प्रतिनिधी । डॉक्टरांवर देशभरात होत असलेले हल्ले पाहता इंडियन मेडिकल असोसिएशनने शुक्रवारी १८ जून रोजी काळी फिती लावून निषेध आंदोलन केले. या आंदोलनाच्या समर्थन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनतर्फेदेखील काळी फिती लावत कामकाज करण्यात आले. याबाबत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांना निवेदन देण्यात आले आहे.

वैद्यकीय शिक्षक असोसिएशनने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड -१९ च्या महामारीमध्ये दीड वर्षापासून डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचारी स्वतःचा व कुटुंबातील सदस्यांचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. पण काही ठिकाणी नागरिकांकडून डॉक्टरांवर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले होऊन मारहाण करण्याचे प्रकार वाढत आहे. यामुळे त्यांचे मनोधैर्यदेखील खचत असून यासाठी देश व राज्य पातळीवरील इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावच्या वैद्यकीय शिक्षकांनी पाठिंबा दिला असून शुक्रवारी काळी फित लावून निषेध नोंदविला जात आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना वैद्यकीय शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. विजय गायकवाड, डॉ. वैभव सोनार, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. आस्था गणेरिवाल, डॉ. संगीता गावित, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. विलास मालकर आदी उपस्थित होते.

Protected Content