अखेर रयत सेनेचा भाजपला पाठींबा

सांगली । भाजपने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून आता सदाभाऊ खोत यांच्या रयत सेनेच्या उमेदवाराने पुणे मतदारसंघातून माघार घेत भाजपच्या उमेदवाराला पाठींबा जाहीर केला आहे.

नाराज असलेल्या सदाभाऊ खोत यांची मनधरणी करण्यात अखेर भाजपला यश आले आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेने माघार घेत, भाजपचे उमेदवार संग्रामसिंह संपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. सांगलीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उमेदवार उभा करुन भाजपासमोर आव्हान उभं केलं होतं. या सर्व पार्श्‍वभूमीवर सदाभाऊ खोत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सोमवारी सांगलीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विरोधी महाविकास आघाडीला फायदा होऊ नये, या दृष्टीने भाजपाला मदत करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यासोबत यापुढील काळात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आणि माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यानुसार रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी आणि सदाभाऊ खोत यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी माघार घेतली जाईल, अशी भूमिका बैठकीत जाहीर केली.

Protected Content