“ॲग्रीस्टॅक” योजनेत शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात रावेर तालुका अव्वलस्थानी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुका जळगाव जिल्ह्यात “ॲग्रीस्टॅक” योजनेत शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात अव्वलस्थानी आहे. आतापर्यंत ५१ हजार ६९८ शेतकऱ्यांपैकी ११ हजार ३०५ शेतकऱ्यांनी योजनेत आपली नोंदणी करून शेतकरी ओळखपत्र तयार केले आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज आणि जलद गतीने मिळावा. यासाठी केंद्र शासनाने “ॲग्रीस्टॅक” योजना सुरू केली आहे.

 

“ॲग्रीस्टॅक” ही योजना कृषी क्षेत्रातील डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ जलद व सोप्या पद्धतीने मिळवून देण्यासाठी बनवली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीविषयक माहिती आणि आधारसंलग्न डेटा संच तयार केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार प्रमाणिकरणाची गरज भासणार नाही आणि योजनांचा लाभ त्वरित आणि सुलभ पद्धतीने पोहोचवता येईल.

“ॲग्रीस्टॅक” योजनेची अंमलबजावणी रावेर तालुक्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्राम विकास अधिकारी (ग्रामसेवक) आणि कृषी सहाय्यक यांच्याद्वारे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. शासनाच्या सुधारित आदेशानुसार, २२ जानेवारी २०२५ पासून रावेर तालुक्यातील C.S.C. केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्डसह व आधार संबंधित मोबाईल नंबर घेऊन C.S.C. केंद्र चालवणाऱ्या प्रतिनिधींशी किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार बंडु कापसे यांनी केले आहे.

तहसीलदार बंडु कापसे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करत सांगितले की, “ॲग्रीस्टॅक” योजनेचा लाभ घेतल्यास शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ जलद व सुलभतेने मिळू शकेल. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांची माहिती सहजपणे अपडेट केली जाऊ शकते आणि योजनांचा फायदा पटकन पोहोचवता येईल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांचे काम सोपे होईल आणि सरकारी योजनांचा वेळेवर व योग्य लाभ मिळवता येईल. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना तहसीलदार कापसे यांनी दिली आहे.

Protected Content