रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील रसलपूर येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ५५ किलो गोवंश जातीचे मांस जप्त केले आहे. या प्रकरणी शेख हुसेन आणि शेख इसाक या दोघांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शेख हुसेन याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रसलपूर परिसरात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गोवंश जातीच्या मांसाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, रावेर पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई करत हे मांस जप्त केले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर परिसरात प्रतिबंधित मांसाविरुद्ध पोलिसांची ही सातवी कारवाई आहे. पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. वारंवार होणाऱ्या या कारवायांवरून रावेर तालुक्यात गोवंश मांसाची अवैध विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे दिसून येते. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करून यात सामील असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.