लोणीकरांच्या वक्तव्यामुळे संताप; ठाकरे गटाचे निषेध आंदोलन !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी आणि महिलांविरोधात केलेल्या कथित अपशब्दांच्या निषेधार्थ आज जळगावात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. जळगाव महानगरपालिकेसमोर लोणीकर यांचा पुतळा दहन करत, त्यांच्या फोटोला जोडे मारून कार्यकर्त्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.

आमदार लोणीकर यांनी अलीकडेच केलेल्या एका वक्तव्यात, ‘आम्ही शेतकऱ्यांना कपडे, चप्पल, उदरनिर्वाहासाठी पैसे, सर्व सुविधा पुरवतो, तसेच लाडक्या बहिणींनाही पैसे सरकारच देत आहे,’ असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि महिला वर्गामध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

याच पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लोणीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा धिक्कार असो!’, ‘शेतकरी आणि महिलांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध असो!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनकर्त्यांनी लोणीकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत, त्यांना तात्काळ माफी मागण्याची मागणी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, भाऊसाहेब सोनवणे, विजय बांदल, मनिषा पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.