


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झालेल्या अहिरवाडी येथील ग्रामस्थांच्या मदतीसाठी रावेर पोलिसांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. पुरामुळे बाधित झालेल्या सुमारे १४० ते १५० ग्रामस्थांना रावेर पोलीस स्टेशनच्या वतीने जेवणाचे वाटप करण्यात आले.
रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे अहिरवाडी गावात २४ जून २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. गावातील नाल्यालगत राहणाऱ्या अनेक ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले होते. या परिस्थितीची माहिती मिळताच रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पूरग्रस्त ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत मिळावी या उद्देशाने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून २८ जून रोजी अहिरवाडी येथे मदतकार्य राबविण्यात आले. यावेळी पुरस्थितीमुळे अडचणीत आलेल्या सुमारे १४० ते १५० ग्रामस्थांना रावेर पोलिसांच्या वतीने जेवणाचे वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमात पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, सुनील वंजारी आणि तथागत सपकाळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांच्या या मदतकार्यामुळे पूरग्रस्त ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला. हा सामाजिक उपक्रम जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांच्या प्रेरणेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. रावेर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. पुरामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना पोलिसांनी केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता मदतीचा हात दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. रावेर पोलिसांच्या या सामाजिक कार्याबद्दल अहिरवाडी येथील ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार मानले.



