फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात फैजपूर पोलीस स्टेशनने पुन्हा एकदा धडक कारवाई करत अकलूद गावातून एकूण २८ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. या कारवाईदरम्यान दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून दोन जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, सहाय्यक फौजदार संजय झाल्टे, पोलीस हवालदार विकास सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल मुकद्दर तडवी तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल शारदा देवगिरे यांच्या पथकाने १९ जुलै २०२६ रोजी अकलूद गावात विशेष मोहीम राबवून अवैध दारू विक्रेत्यांवर छापे टाकले.

कारवाईदरम्यान राजू गिरधर कोळी (रा. अकलूद) हा गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना पोलिसांच्या निदर्शनास आला. त्याच्याकडून १६ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुकद्दर तडवी यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच मोहिमेदरम्यान अकलूद येथील एका महिलेकडेही गावठी हातभट्टीची दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिच्या ठिकाणी छापा टाकून १२ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल शारदा देवगिरे यांच्या तक्रारीवरून संबंधित महिलेविरुद्ध स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण २८ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली असून, अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परिसरात अवैध मद्यविक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस सातत्याने गुप्त माहितीच्या आधारे कारवाया करत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. फैजपूर पोलीस स्टेशनकडून अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. समाजात बेकायदेशीर व्यवसायाला कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. तसेच नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाची माहिती तातडीने पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



