


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन), जळगाव येथे चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृह प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सिंधी कॉलनी, अंध शाळेजवळ, जळगाव येथे असलेल्या या शासकीय वसतिगृहात कनिष्ठ महाविद्यालय विभागातील (इयत्ता ११ वी) तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या नियमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग तसेच अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षण धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व निवासी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये दूध, नाश्ता, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य, संगणक सुविधा, वाय-फाय सुविधा तसेच इतर आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी वसतिगृह कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहाचे अधीक्षक अजय ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित निवास, शैक्षणिक साधने आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.



