…हे तर भाजपचे पुतना मावशीचे प्रेम : आ. शिरीष चौधरी यांचा टोला

रावेर प्रतिनिधी । भारतीय जनता पक्ष विरोधात असला की त्यांना शेतकर्‍यांचा पुळका येतो. केळी उत्पादक शेतकर्‍यांचा हितकर्ता म्हणून सध्या या पक्षाची सुरू असणारी धडपड ही पुतना मावशीच्या प्रेमासारखी असल्याचा टोला आमदार शिरीष चौधरी यांनी मारला आहे.

खासदार रक्षा खडसे या मतदारसंघात फिरून शेतकर्‍यांशी संपर्क साधत आहेत. यावेळी तालुक्यात ठिकठिकाणी बोलताना सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून आमदार चौधरी यांनी या बाबत अधिक लक्ष घालण्याची गरज होती असे त्या सांगत आहेत. याला आमदार शिरीष चौधरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केळी पीक विमा योजनेची विमा घेण्याची मुदत संपल्यावर केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपतर्फे ९ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्याची धडपड चालली आहे. त्या संदर्भात त्या पक्षाचे नेते गावोगाव जावून भाषणबाजी करत आहेत. यात त्यांची शेतकर्‍यांबद्दलची कणव नसून पुतना मावशीचे प्रेम आहे. जेव्हा या विम्यासाठी शेतकर्‍यांना काही मदत करण्याची वेळ होती तेव्हा ही मंडळी एकदाही समोर आली नाही, अशा शेलक्या शब्दांत आमदार शिरीष चौधरी यांनी येथील पत्रकार परिषदेत खासदार रक्षा खडसे यांच्यावर टीका केली आहे.

आमदार चौधरी म्हणाले की, आपण स्वत: गेल्या दीड महिन्यापासून पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार, अधिकारी, कृषी मंत्री व मुख्यमंत्री यांच्या भेटी शेतकरी शिष्टमंडळासह घेवून हा प्रश्‍न लावून धरला होता हे उघड आहे. त्यावेळी भाजपचा कोणताही लोकप्रतिनिधी पुढे आलेला नाही. रक्षा खडसेंनी माझ्यावर केलेल्या आरोपमागील बोलवता धनी वेगळाच आहे असे आहे. हे न समजण्या इतकी जनता दुध खुळी नाही. रावेर येथील पत्रकार परिषदेत सांगितलेली माहिती भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे त्यांची बाजू घेवून खासदार खडसे आरोप करीत आहेत. व त्यांच्या सोबत येण्याची विनंती करीत आहेत. मात्र मला बोलवण्यापेक्षा खडसे यांना आवाहन आहे की त्यांनीच आमच्या सोबत यावे.

आ. चौधरी पुढे म्हणाले की, भाजप नेत्यांना ते विरोधी पक्षात असले की शेतकर्‍यांचा पुळका येतो व सत्तेत आले की शेतकर्‍याला वार्‍यावर सोडतात. आधी कापसाच्या भागासाठीचा देखावा केला. सत्ता येताच कापसाला भाव दिला नाही. आता केळीचा विषय घेतला आहे. कोणाच्या सोबत रहायचे याचा खासदार खडसेंनी गांभीर्याने विचार करावा. उगाच कोणाची बाजू व्यर्थपणे उचलून धरण्याचा प्रमाद करू नका, असा सल्ला आमदार चौधरी यांनी दिला आहे.

Protected Content