पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त ; भाजपाच्या वर्चस्वाला धक्का

 

 

 मुंबई : वृत्तसंस्था । महाविकास आघाडीने भाजपाचं वर्चस्व असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करत जोरदार दणका दिला आहे.

 

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सत्तेत असलेले पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही.  महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून ही समिती बरखास्त करण्यासाठी प्रयत्नशील होती. अखेर सरकारने आदेश काढत जिल्हाधिकारी प्रशासक  म्हणून नेमले  आहे.

 

अंबाबाई, जोतिबा या प्रमुख देवस्थानांसह कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एकूण ३०४२ देवस्थानांचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीत समावेश आहे. ७ मार्च २०१२ रोजी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यपालांनी अधिसूचना काढून देवस्थानाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला होता. त्यानंतर समितीवर २०१० ते २०१७ या कालावधीत कुणीही अध्यक्ष नव्हतं. राज्यात भाजपा शिवसेनेचं सरकार आल्यानंतर समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव यांच्यासह सदस्य म्हणून राजाराम गरुड, राजेंद्र जाधव, चारुदत्त देसाई, शिवाजी जाधव आणि वैशाली क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. महेश जाधव हे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. सरकारच्या आदेशानंतर अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह सहा सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. या निर्णयामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना मोठा धक्का बसला आहे.

 

समिती बरखास्त केल्याने आता एक वर्षासाठी हा कार्यभार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे असणार आहे. त्यानंतर ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.

Protected Content