माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन

मुंबई |  माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज  सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. एकनाथ गायकवाड हे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होत.

एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी १०.०० वाजता कोरोनामुळे त्यांचं  निधन झाले.  गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत अत्यंसंस्कार होतील.

गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते.  एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले होते. मात्र, नंतर शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता.

ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दु:ख व्यक्त केले आहे. ”काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक असून सर्वसामान्यांसाठी झटणारे एक अनुभवी आणि निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.” असे महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे.

Protected Content