कब्रस्थानातून ‘त्या’ बालिकेचा मृतदेह काढून केला पंचनामा; रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखलचे काम सुरू

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा हुडको वसाहतीत तीन महिन्यांपासून राहायला आलेल्या जावेद अख्तर शेखने मोठी मुलगी कनीज फातेमा हिला अपशकुनी असल्याने छळ करून जीवे ठार मारून कब्रस्थानात दफन केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीला आली. मुलीच्या नाना नानी व मामा यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीसात आईवडीलांवर संशयास्पद मृत्यूप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. आज बुधवारी सकाळी दफन केलेल्या कब्रस्थानातून मृतदेह काढून पंचनामा केला असून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह आणण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू आहे. 

अधिक माहिती अशी की, केमिस्टचे काम करणाऱ्या जावेद अख्तर शेख जमालोद्दिन रा. रझा नगर पिंप्राळा हुडको हा पत्नी व कानीज फातेमासह दोन यांच्यासोबत राहतो. कानीजच्या जन्मानंतर काही दिवसांत दिवसांत जावेदच्या आईचे निधन झाल्याने कनीज फातेमा नावाची ही मुलगी कुटुंबासाठी अपशकुनी आहे, असा समज होऊन जावेदने तिचा छळ सुरू केला होता, असे तिचा मामा व तक्रारदार अजहर अली शौकत अली ( रा.अमळनेर) यांचे म्हणणे आहे. ती दोन वर्षांची असताना जावेदच्या मेडिकल स्टोअरला आग लागून त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तेव्हापासून छोट्या कनीजचा जास्तच छळ त्याने सुरू केला. तिचे डोके भिंतीवर आपटणे, दोन दोन दिवस तिला जेवायला न देणे, कोंडून ठेवणे, मारणे असे प्रकार तो करीत असे. हा छळ सहन न झाल्याने कनीजच्या नाना-नानीने तिला आपल्या घरी नेले. तरीही तिला भेटण्याच्या निमित्ताने तिचे आई-वडिल त्यांच्या घरी जात व काही दिवसांसाठी म्हणून तिला घरी आणून पुन्हा तिचा छळ करीत, असे अर्जात म्हटले आहे. २५ एप्रिलच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास जावेदने घरमालक आरीफ खान यांना झोपेतून उठवले आणि आपल्या मोठ्या मुलीचे निधन झाल्याचे त्यांना सांगितले. सकाळी तिचे काका घरी आले. त्यांच्यासह परिसरातील मोजक्या लोकांनीच कब्रस्तानात जाऊन तिचा दफनविधी केला. हा प्रकार जावेदने सासु व सासरे यांना कळविले नव्हते. शेजारचांच्या लक्षात आल्याने दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी त्यांनी मयत कानीजच्या मामा व आजीआजोबांना फोनद्वारे घटनेची माहिती कळविली. मामा व आजीआजोबाद तातडीने जळगाव दाखल झाले. भाचीवर केलेल्या छळाबाबत पोलीसात जावीद अख्तर शेख जमालोद्दीन (हुडको), शेख साजीद अख्तर शेख जमालोद्दीन, फिरोज अख्तर शेख  जमालोद्दीन (अमळनेर), निलोफर परवीन निसार खान (धुळे) यांनी इतरांना न कळविता परस्पर दफन केला आहे असा तक्रार अर्ज केला. मंगळवारी कनीजच्या आईवडीलांची पोलीस अधिकक्ष डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमारचिंथा यांच्या उपस्थितीत चौकशी करण्यात आली. दरम्यान आज बुधवारी सकाळी ९ वाजता कब्रस्थानात दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलीसांसह डॉक्टरांनी पंचनामा केला असून आता अहवाल येण्याचे बाकी आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रामानंद नगर पोलीसात आज दुपारपासून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Protected Content