अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची होणार चौकशी; राष्ट्रवादीच्या मागणीला यश

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील अपूर्ण असणार्‍या पाणी पुरवठा योजनांची चौकशी करण्याचे आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पाठपुरावा केला जात आहे.

तालुक्यातील भारत निर्माण, स्वजलधारा योजनेतून सुमारे ६० गावांच्या पाणीपुरवठा योजना अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. या योजना सद्यस्थितीत अर्धवट पडलेल्या आहेत. यामध्ये घोळ झाल्याचा आरोप करण्यात येत असून याबाबत अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. या पार्श्‍वभूमिवर, संबंधीत योजनांच्या कार्यान्वयनात अपहार करणार्‍यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील यांनी अलीकडेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.

या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून ६० ते ७० गावांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. त्यातील फक्त १० ते १२ गावांच्या योजना काही प्रमाणात पूर्ण आहेत. मात्र, भारत निर्माण व स्वजलधारा अशा पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. या योजना अजूनही अर्धवट आहेत. ठेकेदाराने योजना पूर्ण दाखवून बिले काढून घेतली. दुसरीकडे शासकीय निधीचा खर्च होवूनही गावे तहानली आहेत. या ठेकेदारांवर राजकीय वरदहस्त असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी. दोषी ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली. या पत्राची तात्काळ दखल घेत ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

यामुळे आता अपूर्ण पाणी पुरवठा योजनांमधील अपहाराची चौकशी होणार असून यातून दोषींवर कारवाई होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content