पीएम किसान योजनेपासून लाभार्थी वंचित

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेची रक्कम मिळाली नसून याचा लाभ त्वरीत मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे.

याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना पी एम किसान योजनेंतर्गत मिळणार्‍या रकमा मिळालेल्या नाहीत अनेक शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमांकात चुका असून काही शेतकर्‍यांचे आधार कार्ड अपडेट नसल्याने या योजनेच्या रकमा मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे.

शेतकर्‍यांच्या बँक खात्याच्या क्रमांकातील दुरुस्ती किंवा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांना महसूल व कृषी विभागांचे कर्मचारी फिरवाफिरव करत आहे. यासाठी शेतकरी तहसील कार्यालयात चौकशीसाठी गेल्यावर तेथून त्यांना कृषी विभागात पाठवले जाते तर कृषी विभागाचे अधिकारी पुन्हा यासाठी तहसीलदार कार्यालयात पाठवतात. अशी टोलवा-टोलवी सुरू आहे. यामुळे पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित असलेले तालुक्यातील शेतकरी या दोन्ही विभागांच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे कमालीचे वैतागले आहेत.

याबाबत शेतकर्‍यांनी पंचायत समितीचे माजी सभापती व सदस्य जितू पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे . या विषयावर शुक्रवारी पंचायत समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content