चाळीसगाव आगार व्यवस्थापकासह लिपिकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी येथील आगारातील २७ वर्षीय कनिष्ठ लिपिक तरुणीस  वेळोवेळी मनाला लाजवेल असे कृत्य करून त्रास दिल्यावरून आगार व्यवस्थापक संदीप निकम व वरिष्ठ लिपिक नितीन पाठक या दोघांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा रविवार रोजी सायंकाळी दाखल करण्यात आला आहे. .

चाळीसगाव आगाराचे व्यवस्थापक संदीप कृष्णा निकम व वरिष्ठ लिपिक नितीन बाळकृष्ण पाठक यांच्याकडून कनिष्ठ लिपिक असलेल्या तरुणीला  गेल्या काही दिवसांपासून त्रास दिला जात होता. अनेक विभागाची कामे लादने, रात्री उशिरापर्यंत ड्यूटी लावणे, आगार प्रमुख यांच्या दालनात बराच वेळ विनाकारण उभे करून ठेवणे व विक्षीप्त नजरेने पाहणे अशा प्रकारे कनिष्ठ लिपिक तरुणीला  त्रास दिला जात होता.  मुलगी असल्याने रात्रीची ड्यूटी बदलण्यासाठी तिने अर्ज केला असता त्यावर कुठलीही कारवाई न करता पुन्हा तिला त्रास दिला जात होता. त्याचबरोबर तु बाहेर जिल्ह्याची आहेस,  तुला अजून लग्न करायचे बाकी आहे. तु माझ्या विरोधात जाशील तर तुला महागात पडेल असा दम निकम यांनी तिला असल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे.  दरम्यान दि. २ जून रोजी सकाळी १० ते १०:३० वाजताच्या सुमारास आगारातील लेखा विभागात काम करीत असताना प्रमुख निकम म्हणाले की, तु माझी इच्छा पूर्ण करीत नाही म्हणून मी तुला त्रास देतो. तु मला आवडतेस, हा प्रकार वरिष्ठ लिपिक भावसिंग राजपूत व चालक मुस्तक शेख यांनी ऐकला. दरम्यान १२ जून रोजी तिला निलंबित करण्यात आल्याचे फिर्यादीत तिने म्हटले आहे. याप्रकरणी आगार व्यवस्थापक संदीप कृष्णा निकम व वरिष्ठ लिपिक नितीन बाळकृष्ण पाठक यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात भादवी कलम- ३५४ अ, ३५४ अ (१)( आय), ३५४ (डी), ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहेत.

Protected Content