अपंगत्वाचे बनावट दाखले : सहा ग्रामसेवकांवर गुन्हा

Raver : रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अपंगात्वाचे बनावट दाखल देऊन बदलीत सोयीचे ठिकाण मिळविल्याच्या प्रकरणात तालुक्यातील सहा ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी अपंगत्वाचे बनावट दाखले सादर केल्याची तक्रार करण्यात आली होती. अपंग नसताना बनावट व खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ग्रामसेवक शिवाजी गुलाबराव सोनवणे, राहुल रमेश लोखंडे, छाया रमेश नेमाडे, नितीन दत्तू महाजन, रवींद्र कुमार काशीनाथ चौधरी व शामकुमार नाना पाटील यांनी आपल्याला हव्या त्या ठिकाणी बदली करून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.

याप्रकरणी निंबोल येथील किशोर भिवा तायडे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी होऊन न्यायाधीश अनंत बाजड यांनी सदर सहाही ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यात फिर्यादींच्या वतीने ऍड. कुणाल गवई यांनी काम पहिले.
दरम्यान, या प्रकरणी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थायी वैद्यकीय मंडळाने चौकशी करून अहवाल सादर केला होता. यात शिवाजी सोनवणे यांची अँजिओप्लास्टी झालेली असताना त्यांनी हृदय शस्त्रक्रिया झाल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला आहे. तर उर्वरित पाच जणांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थायी वैद्यकीय मंडळाने दिलेला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: