फिरायला जाताय ? मग जिल्हाधिकार्‍यांचा ‘हा’ आदेश आधी जाणून घ्या !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पावसाळ्यात मस्तपैकी एखाद्या पर्यटन स्थळावर फिरावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र ते खूप धोक्याचे देखील असते. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जारी केलेले नवीन निर्देश हे अतिशय महत्वाचे व उपयुक्त आहेत.

पावसाळ्यातील पर्यटन आणि विशेष करून जलसाठ्यांच्या जवळ फिरणे हे अनेकदा जीवावर बेतते. अशा अनेक घटना नित्यनेमाने घडत असतात. यातच अलीकडेच रावेर तालुक्यातील सुकी नदीवरील गारबर्डी येथे असणार्‍या धरणाच्या जलप्रवाहात नऊ तरूण अडकून पडले होते. प्रशासनाने तत्परतेने व प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्यांचे प्राण वाचविले. मात्र येथे मोठा अनर्थ होण्याची देखील शक्यता होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जळगाव जिल्ह्यात ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू करण्याची घोषणा केली आहे.

‘आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू केल्यामुळे जिल्ह्यातील धोकेदायक ठिकाणी तसेच धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना मनाई राहणार आहे. त्या अनुषंगाने गृह विभाग, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभागासह इतर विभागांना त्यांनी जबाबदार्‍या सोपवल्या आहेत. या विभागांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विशेष करून नदी, धरण वा धबधब्यांखाली अंघोळ करणे, उंच ठिकाणी चढण्याचा प्रयत्न करणे, जीवाचा धोका पत्करून सेल्फी काढणे आदी प्रकारांना यामुळे आळा बसण्याची शक्यता आहे. तर, आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यामुळे जिल्ह्यातील महत्वाच्या पर्यटनाच्या ठिकाणी दुर्गम भागात पर्यटकांना जाता येणार नाही. यासाठी आवश्यक असणार्‍या धोक्याच्या सूचना, त्यांचे फलक आदी लावण्यात येणार असून आवश्यक त्या ठिकाणी शासकीय कर्मचारी देखील तैनात करण्यात येणार आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: