रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरात श्रीकृष्ण व दत्तात्रेय महाराजांच्या जय घोषाच्या गजरात श्रीपादवल्लभ दिगंबर भगवान श्रीकृष्ण व श्री दत्तात्रेय महाराज यांचा रथ मिरवणुकीला मोठ्या उत्साहात जोरदार सुरुवात झाली. विधिवत पूजा व मंत्रोपचार करून सुरुवातीला महीलांना रथ ओढायला प्रारंभ केला.या भव्य मिरवणुकीत हजारो भक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
मिरवणुकीत प पू दिनबंधूदास महाराज, प पू केशवानंद महाराज, प पू पुरोषत्तमदास महाराज, दत्त मंदीर गादीपती श्रीपाद महाराज, ऋषीकेश महाराज, प पू महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज, प पू कन्हैया महाराज यांची विशेष उपस्थिती होती. यासोबतच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तहसीलदार बंडू कापसे, माजी उपानगरध्यक्ष अनिल अग्रवाल, हरिष गणवानी, भाजपा उद्योग आघाडी जिल्हाउपाध्यक्ष अरुण शिंदे, माजी नगरसेवक अशोक वाणी, हर्षल अग्रवाल, विशाल अग्रवाल आदी मान्यवर देखील उपस्थित होते.
मिरवणुकीच्या सुरुवातीला संजय मटकरी, कपिल दुबे, आनंद दुबे, गणेश दुबे यांनी मंत्रोपचार व विधिवत पूजा करून रथ ओढण्याचा प्रारंभ केला. अंतरराष्ट्रीय इस्कॉन श्रीकृष्ण पथक रथापुढे भजन कीर्तन करत श्रीकृष्णाचे संगीत वाजवत भक्तांचे लक्ष वेधत होते. भाविकांनी रथावरून प्रसाद म्हणून रेवड्या उधळल्या, त्यामुळे मिरवणुकीत उत्साह द्विगुणित झाला.
रावेर शहरात या मिरवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात यात्रा भरली आहे. उद्या पालखी असणार असून फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. त्यामुळे तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भक्त येण्याची अपेक्षा आहे. रावेर शहराने या धार्मिक उत्सवात एकत्र येऊन भक्तीमय वातावरण निर्माण केले आहे.