जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा कारागृहमध्ये तृतीयपंथीय बंद्याकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिलं बॅरेक बांधण्यात आले आहे. तर जळगाव जिल्हा कारागृह वर्ग-२ मध्ये पुरुष बंदयाकरीता दोन नवीन बॅरेक बांधण्यात आले आहेत. या कारागृहाची बंदी क्षमता २०० इतकी असून यात प्रत्यक्ष ५२४ बंदी बंदिस्त आहेत. नविन बॅरेकच्या बांधकामामुळे कारागृहामध्ये ६० बंदी सामावून घेईल इतकी नवीन वाढीव क्षमता निर्माण झालेली आहे. या बॅरेक बांधकामाचे उद्घाटन कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक श्री डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. या जिल्हा कारागृहा करीता जिल्हा नियोजन समिती कडून एकूण १,१०,८०,२१३ रुपये निधी प्राप्त झाला होता. ज्यात पुरुष बंदयाकरीता दोन नवीन बॅरेक ७३,७७,५१४ रुपये व तृतीयपंथी बंद्याकरीता एक बॅरेक ३७,०२,६९९ रुपये खर्च करुन बांधकाम करण्यात आलेले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मदतीने कारागृहातील बंदयाचे टी.बी., एच आय व्ही, क्षयरोग, कुष्ठरोग, व इतर आवश्यक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्य तपासणी नुसार बंदयावर उपचार देखील करण्यात आलेले आहेत. तसेच कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेकरीता चार वॉचटॉवर, मुख्यप्रवेशव्दार, स्वयपांकगृह रंगरगोटीची कामे प्रगतीपथावर असल्याने श्री डॉ. जालिंदर सुपेकर यांनी कामाची पाहाणी करून कामे तत्काळ पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. बॅरेक बांधकामाच्या उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद , जळगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री नखाते, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री. गजानन विठ्ठल पाटील व इतर सर्व कर्मचारी उपस्थीत होते.