दिलासा : गोडेतेलाच्या भावात होणार घट !

मुंबई प्रतिनिधी | गेल्या अनेक महिन्यांपासून खाद्य तेलाच्या वाढलेल्या मूल्यात घट करण्याचा निर्णय उत्पादक कंपन्यांनी घेतल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून गोडे तेलाचे दर हे दुपटीपेक्षा जास्त वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदील झाले होते. एकीकडे इंधनामुळे महागाई कडाडली असतांना खाद्य तेलाचे दर देखील वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. या पार्श्‍वभूमिवर खाद्य तेलाचं उत्पादन करणार्‍या कंपन्यांनी तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे याचा फायदा सामन्यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर सामान्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

सॉल्वेंट एक्ट्रॅक्टर्स असोसिएशन अर्थात एसईएनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या कंपन्यांनी आपल्या तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात खाद्यतेलाचं उत्पादन करणार्‍या अनेक मोठ्या कंपन्यांनी तेलाच्या होलसेल किमतींमध्ये घट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अदानी विलमर, रुची सोया, जेमिनी एडिबल्स, मोदी नॅच्युरल्स, गोकुळ रिफॉइल्स, विजय सॉल्वेक्स, गोकुळ ऍग्रो आणि एन. के. प्रोटेन्स या कंपन्यांचा समावेश आहे.

या कंपन्यांनी होलसेल तेलविक्रीच्या किमतींमध्ये घट केली आहे. त्यानुसार, प्रतिटन तेलाच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. यात प्रतिटन ४ हजार ते ७ हजार रुपये कमी केल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या कंपन्यांकडून विक्री होणार्‍या प्रतिलिटर तेलाच्या किमती ४ ते ७ रुपयांनी कमी झाल्या आहेत. मात्र मूल्य अजून कमी होण्याची सर्वसामान्यांना अपेक्षा आहे.

Protected Content