हार्ट ऑफ गोल्ड : कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतरही रुग्णसेवेच्या बाबतीत निगेटिव्ह न झालेले खरे योद्धे….

जळगाव । कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अनेक डाक्टर्सनी सेवा बंद केली असतांना जळगाव येथील डॉ. अमित नारखेडे हे अव्याहतपणे चिमुकल्यांवर उपचार करत आहेत. मध्यंतरी ते स्वत: कोरोना बाधीत झाले तरी यातून बरे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा सेवा सुरू केली असून यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

डॉ. अमित नारखेडे
एम. डी. (पेडिअ‍ॅट्रिक), नवजीवन हॉस्पिटल
जळगाव

सलाम त्यांच्या समर्पणाला !

लॉकडाऊनच्या काळात काही हॉस्पिटल बंद त्यामुळे रुग्णांचे होणारे हाल. त्यातही रुग्ण जर लहान बाळ असेल तर ज्याला होणारा त्रासही सांगता येत नाही. स्वतः डॉक्टर तेही लहान मुलांचे त्यामुळे आपण हॉस्पिटल बंद ठेऊन चालणार नाही, ही गाठ मनाशी बांधत २२ मार्चपासून सुरु झालेल्या लोकडाऊनच्या काळापासून आतापर्यंत हॉस्पिटल बंद न ठेवता लहानग्यांचे उपचार करणारे डॉक्टर म्हणजे जळगावातील डॉ. अमित नारखेडे.

डॉ. अमित नारखेडेंचे हॉस्पिटल सुरूच होते. रोज १००-१२५ लहान मुले , बाळ हॉस्पिटलला तपासणीसाठी येत होतीच. त्यांच्याबरोबर पालकही असतंच. तरी ही संख्या व त्याबरोबरची रिस्क बघता डॉक्टरांनी प्रत्येक पेशंटला पर्सनल मोबाईल नंबर दिला होता. मोबाईल वर कॉल आला की ते बाळाला होणारा त्रास समजून घेत व त्यावर औषधोपचार सांगत. जर २४ तासांत फरक जाणवला नाही तर भेटण्याचा सल्ला देत. मार्चपासून ते आतापर्यंत त्यांनी जवळपास २२५० लहानग्यांची तपासणी स्वतः केल्याची नोंद आहे.

विशेष म्हणजे ते स्वतःच्या हॉस्पिटल बरोबरच दुसर्‍या हॉस्पिटलला प्रसूतीसाठी जात. एवढ्या लोकांच्या संपर्कात तुम्ही येत आहात भीती वाटत नाही का ? असा प्रश्‍न विचारला असता आता रिस्कचा विचार करून कसे चालेल, आता काय रिस्क कामच आहे माझे. लहानग्यांना सेवा देऊन मिळणारा आनंद मी रोज अनुभवतो, असे ते सांगतात. हे सुरु असतानाच घरी असणार्‍या ८ महिन्यांच्या बाळाची, वयस्क आई, डायबिटीज असलेले वडील यांची चिंता असायची. घरी गेल्यावर बाळापासून नेहमी अंतर ठेवावे लागायचे. इतरांच्या मुलांच्या भल्यासाठी त्यांनी हे सर्व सहन केलं.

पण हे सर्व करत असतांनाच एके दिवशी शरीराचे तापमान वाढण्याबरोबर बॉडी पेन सुरु झाले. रिपोर्ट काढले ते पॉझिटीव्ह आले. पॉझिटीव्ह आल्यानंतर ते घरीच २१ दिवसांसाठी आयसोलेट झाले. आई फिजिशियन असल्याने त्यांच्या देखरेखीखाली त्यांनी उपचार घेतले. परंतु आयसोलेशनच्या २१ दिवसांबद्दल तो २१ दिवसांचा एका खोलीत घालवलेला काळ खूप कठीण असतो. परिवार जवळ असूनही भेटता येत नाही. या काळात सर्वात जास्त मानसिक खच्चीकरण होते. असे ते म्हणतात.

कोरोनाला हरवून परत त्यांनी आपली सेवा अविरत सुरु ठेवली. फक्त आता काळजी थोडी जास्त घेतली जाते. त्यांच्या आईही फिजिशियन,त्यांनीही वयाची पर्वा न करता त्यांचे क्लीनिक सुरूच ठेवले.

सलाम डॉ. अमित नारखेडे व त्यांच्यासारख्या सर्व कर्मप्रेमींना !

( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्‍या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )

अधिक माहितीसाठी

फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers

Protected Content