भडगावात शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेने रस्तारोको आंदोलन

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकरी बांधवांच्या प्रलंबित आणि विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांनी शासनाकडे सातबारा उतारा कोरा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सरकारवर आरोप केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करून सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कर्जमाफीचा उल्लेख न करता, फक्त मतांचे राजकारण करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे देवरे यांनी सांगितले.

देवरे यांनी शासनाला सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी करताना, कापसाला दहा हजार रुपये हमीभाव देण्याचीही मागणी केली. त्यांनी भडगाव तालुक्यात सीसीआय अंतर्गत नवीन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली. तसेच, तालुक्यातील सट्टा, मटका, गांजा, भांग आणि वाळूचे अवैध धंदे बंद करून, शेतकऱ्यांच्या मुलांना या वाममार्गापासून दूर ठेवण्याचे आवाहन केले.

या मागण्यांसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेने रस्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात भडगाव तालुका अध्यक्ष अभिमन हाटकर, पारोळा तालुका अध्यक्ष डॉ. विनोद चौधरी, पारोळा तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील यांच्यासह तालुक्यातील शाखा, कार्यकारणीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आंदोलनाचे निवेदन शासनाला देण्यात आले.

या आंदोलनामुळे चाळीसगाव-पाचोरा-पारोळा रस्त्यावरील चौफुलीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती. गाड्यांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासनाने यावेळी चोख बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली. शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले आहे. सुनील देवरे यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन चालू राहील. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढा देण्याचे आवाहन केले.

Protected Content