भारतीय कायद्यातील नवीन बदल लोकहिताचे – ॲड. विक्रम शेळके

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय दंड संहिता (IPC) मधील फौजदारी कायद्यात झालेले बदल काळानुरूप आहेत आणि ते सर्व भारतीयांच्या हिताचे आहेत, असे मत विशेष सरकारी अभियोक्ता विक्रम शेळके यांनी व्यक्त केले. त्यांनी सर्वांना आवाहन केले की, कायद्यातील नवीन बदल समजून घेऊन कोणत्याही अफवांना बळी न पडता जनजागृती करण्यात सहकार्य करावे आणि समाजाला अधिक बळकट करावे. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या लैंगिक छळ प्रतिबंधक समिती आणि फैजपूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत बोलत होते.

या कार्यशाळेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे, फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन हबीब सय्यद, उपप्राचार्य डॉ. हरीश नेमाडे, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

मुख्य वक्ता विक्रम शेळके यांनी कायद्यातील विविध बदल, शिक्षेची तरतूद, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया आणि पुरावा कायद्यात आधुनिकतेनुसार झालेले बदल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, हे बदल केवळ कायद्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी नाहीत, तर ते सामान्य माणसाच्या हिताचे आहेत आणि त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाचे रक्षण होईल. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, कायद्याचे योग्य ज्ञान घेऊन ते आपले आयुष्य यशस्वी आणि आनंदी करू शकतात.

पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला की, विद्यार्थी दशेत कोणतेही गैरकृत्य करून आयुष्य बरबाद करू नये. त्यांनी कायद्याचे ज्ञान घेऊन योग्य मार्गाने आयुष्य जगण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, कायद्याचे ज्ञान असल्यास व्यक्ती स्वतःचे आणि समाजाचेही रक्षण करू शकते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे यांनी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कायद्यातील नवीन बदलांबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे महाविद्यालयात आयोजन करण्याबद्दल पोलीस विभागाचे आभार व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली की, ते स्वतः कायद्याचे ज्ञान घेऊन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या बदलांची माहिती पोहोचवतील आणि सकारात्मक जनजागृती करतील.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. डॉ. जे.जी. खरात, प्रा. डॉ. ताराचंद सावसाकडे, प्रा. डॉ. रवी केसुर, प्रा. डॉ. सीमा बारी यांच्यासह प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

या कार्यशाळेद्वारे कायद्यातील नवीन बदलांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळाली आणि त्यांना कायद्याचे ज्ञान घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची प्रेरणा मिळाली. अशा कार्यशाळांमुळे समाजात कायद्याची जागरूकता निर्माण होऊन, प्रत्येक घटकाचे रक्षण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Protected Content