Home प्रशासन रावेरात बुलडोझर ॲक्शनचा धडाका कायम 

रावेरात बुलडोझर ॲक्शनचा धडाका कायम 

0
1


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात प्रशासनाने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील प्रमुख रस्ते मोठ्या प्रमाणात मोकळे झाले असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. वाहतूक सुरळीत झाल्याने शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आता ही मोहीम सातत्याने सुरू ठेवत स्टेशन रोड आणि महालक्ष्मी मंदिरासमोरील परिसर कायमस्वरूपी ‘नो-हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांनी नगरपालिकेकडे याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

रावेर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली होती. मुख्य रस्त्यांवर हातगाड्या, फेरीवाले आणि बेशिस्त वाहनतळामुळे पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः बाजारपेठ, शाळा आणि मंदिर परिसरात कायम वाहतूक कोंडी होत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. त्यामुळे नागरिकांकडून सातत्याने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे आणि पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका, महसूल आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या कारवाईत स्टेशन रोड तसेच अंकलेश्वर–बुऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. बुलडोझरच्या साहाय्याने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेक वर्षांनंतर प्रमुख रस्ते मोकळे झाले असून शहरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे.

अतिक्रमण हटवल्यानंतर सर्वाधिक समाधान महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे. “आता रस्त्यावरून सुरक्षित आणि निर्धास्तपणे प्रवास करता येत आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. शहर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त राहण्यासाठी अशा प्रकारची नियमित मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, प्रशासनाने अतिक्रमणाविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. पुढील टप्प्यात गांधी चौक, आठवडे बाजार तसेच महालक्ष्मी मंदिरासमोरील परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या अनुषंगाने काही दुकानदारांना पुन्हा नोटिसा बजावण्यात आल्या असून, येत्या काही दिवसांत या भागातही बुलडोझर ॲक्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कारवाईला शहरातील व्यापारी वर्गाचाही पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले. व्यापारी महेश खाटवाणी, मोतीशेट खटवाणी, विशाल अग्रवाल यांच्यासह काही व्यापाऱ्यांनी पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन अतिक्रमण हटाव मोहिमेचे स्वागत केले. शहराचा विकास, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने सुरू केलेली मोहीम कायम ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एकूणच, रावेर शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे. शहर अधिक सुटसुटीत, सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी स्टेशन रोड व महालक्ष्मी मंदिर परिसर ‘नो-हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करण्याबरोबरच बुलडोझर ॲक्शन नियमितपणे सुरू ठेवावी, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.


Protected Content

Play sound