कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री स्वामिनारायण मंदिरात रासोत्सव व दांडिया महोत्सव


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री स्वामिनारायण मंदिर, जळगाव येथे कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ अवसरानिमित्त भव्य रासोत्सव व दांडिया-गरबा महोत्सव सोमवारी, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला असून, सर्व भाविकांना भक्तिरसात न्हालवणारा कार्यक्रम अनुभवता येणार आहे.

पौर्णिमेच्या दिव्य रात्री भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेचे आयोजन हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. पूर्णचंद्राच्या साक्षीने होणारा हा रासोत्सव, पारंपरिक दांडिया व गरब्याच्या सुरावटींसह भक्तांच्या हृदयाला आध्यात्मिक उन्नतीची अनुभूती देणारा ठरणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात हरिनाम संकीर्तनाने होईल, ज्यामध्ये उपस्थित भाविक मंत्रमुग्ध होतील.

या भक्तीमय उत्सवात प.पू. स्वामी गोविंदप्रसाददासजी स्वामी आणि शास्त्री नयनप्रसाददासजी स्वामी यांचे सान्निध्य लाभणार असून, त्यांच्या प्रवचनातून शरद पौर्णिमेचे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व उलगडले जाणार आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने सर्व भाविकांना पारंपरिक पोशाखात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, महिलांसाठी खास पारंपरिक दांडिया नृत्याचा उत्साह दुपटीने वाढवणार आहे.

कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना कोजागिरीच्या खास प्रसादरूपात दूध वाटप करण्यात येईल. हा कार्यक्रम सर्व वयोगटातील भक्तांसाठी खुला असून, संपूर्ण कुटुंबाने सहभागी होऊन सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सौंदर्याने परिपूर्ण अशा रासोत्सवाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे.