मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दिशा सालीयान प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे विरोधात मालवणी पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आता राणे पितापुत्रांना अटक होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. नारायण राणे आणि नितेश राणे यांना मालवण पोलिसांनी चौकशीला हजर रहाण्याची नोटीस बजावली आहे. नितेश राणेना ३ मार्च तर नारायण राणेंना ४ मार्च रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. दिशा सालीयान मृत्यूसंदर्भात केलेल्या वक्तव्यांमुळे, दिशाच्या आईने मालवणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. दिशा सालीयान सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी तिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूबाबता राणे पितापुत्रांनी केलेल्या वक्तव्यानंतर या वादाला सुरुवात झाली.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियान मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप नारायण राणेंनी केला होता. त्यानंतर दिशाचं मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून दिशाची बदनामी केली जात असल्याचं म्हटलं.