मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या बदनामीचा कट आखला होता असा गौप्यस्फोट करत दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर तोफ डागली असून यामुळे सरकारमधील दोन्ही घटकपक्षांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना केसरकर म्हणाले की, ही वस्तुस्थिती आहे की सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नारायण राणे यांचा मोठा वाटा होता. भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचे माझे जवळचे संबंध आहेत त्यामुळं मी त्यांना विचारलं होतं की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही कसा वापरु देता. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, आमच्या बहुतांश आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे.
केसरकर पुढे म्हणाले की, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचा संपर्क सुरु झाला. त्यानंतर त्यांची भेटही झाली. पण मधल्या काळात भाजपच्या १२ लोकांचं निलंबन झालं होतं. त्यावेळी भाजपकडून निरोप आला होता की आपली बोलणी सुरु आहे आणि असं निलंबन योग्य नाही. दरम्यान, नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांची बोलणी थांबली असे केसरकर म्हणाले.