राष्ट्रवादीत घडामोडी गतीमान : दोन्ही गटांमध्ये रस्तीखेच !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले असून यात कुणाकडे किती संख्याबळ जमणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणार्‍या शपथविधीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील दोन्ही गटांमध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. तर याचसोबत प्रत्यक्षात कोणत्या गटाकडे किती बळ ? याची चाचपणी देखील होत आहे. या अनुषंगाने आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. कारण आज दोन्ही गटांच्या महत्वाच्या बैठका होत असून यातून सर्व काही चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांनी आपल्या आमदार,पदाधिकार्‍यांच्या बैठका बोलावल्या आहे. शरद पवार यांच्या गटाची यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक होणार असून अजित पवार यांच्याकडून एमईटी कॉलेजच्या सभागृहात बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे. अजित पवार गटाची बैठक सकाळी अकरा वाजता होणार आहे.तर शरद पवार यांची बैठक दुपारी एक वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. या बैठकीत नेमके काय होणार यावर राष्ट्रवादीचे भविष्य ठरणार असल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे.

दरम्यान आजच्या बैठकीसाठी दोन्ही गटाने बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला तर अजित पवार यांच्याकडून मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे आमदार यांच्यासाठी शशिकांत शिंदे यांनी देखील व्हीप जारी केला. तर पवार गटातर्फे बैठकीला येणार्‍या कार्यकर्ते पदाधिकारी आमदार यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहेत. ते पक्षा बरोबर आहेत याचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहे.

Protected Content