पावसाअभावी मराठवाडा, विदर्भाची चिंता वाढली

monsoon

पुणे प्रतिनिधी ।  मुंबई, नाशिक, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात दमदार पाऊस झालेला नसुन, मराठवाडा, विदर्भ, खान्देशात पुरेशा पावसाअभावी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

मराठवाड्यात आजवर ३० टक्क्यांच्या आसपास पाऊस होण्याची अपेक्षा असताना फक्त १५.७ टक्के पाऊस झाला आहे. अशीच कमी-जास्त परिस्थिती विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांची असताना राज्यात १७ जुलैपर्यंत म्हणजे पाच दिवस पाऊस हुलकावणीच देईल, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. मान्सूनचा अक्ष बदलल्याने उत्तर भारत, ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. त्यामुळे दक्षिण भारतासह राज्यात मान्सून क्षीण झाला आहे. परिणामी, १७ जुलैपर्यंत राज्यात कोकण वगळता पावसाचा जोर राहणार नाही. उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असे वेधशाळेने कळविले आहे. हवामान तज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, राज्यात १७ जुलैपर्यंत मान्सूनचा खंड पडेल. त्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय होईल. दर मोसमात मान्सूनचा अक्ष एक-दोनदा बदलत असतो. ही सामान्य बाब आहे. राज्यात यंदा 2 आठवडे पाऊस उशिरा सुरु झाला. मराठवाड्यात आधीच पाऊस कमी पडतो. यंदा तो देखील पुरेसा नाही. म्हणून मराठवाड्यात या खंडाची तीव्रता अधिक असेल. विदर्भात देखील यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे.

Protected Content