मुंबई -वृत्तसेवा । बॉलिवूडमध्ये सध्या ‘रामायण’ या भव्य चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, त्याच्या अफाट बजेटसोबतच कलाकारांनी घेतलेल्या मानधनामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटासाठी तब्बल ४००० कोटी रुपयांचे मेगा बजेट ठरवण्यात आल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून, त्याची भव्यता आणि स्टारकास्ट यामुळे तो आधीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे.

चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरने प्रभू रामचंद्रांच्या भूमिकेसाठी प्रचंड मानधन घेतल्याची चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, एका भागासाठी त्याने ७५ कोटी रुपये फी घेतली असून, दोन्ही भागांसाठी त्याची एकूण फी १५० कोटी रुपये इतकी होते. त्यामुळे तो या चित्रपटातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
रावणाच्या भूमिकेत साऊथचा सुपरस्टार यश झळकणार असून, त्याने एका भागासाठी ५० कोटी रुपये फी घेतल्याचे सांगितले जाते. दोन्ही भागांसाठी त्याचे मानधन १०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे त्याची भूमिकाही तितकीच भव्य आणि प्रभावी असणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सीतेच्या भूमिकेत दिसणारी साऊथ अभिनेत्री साई पल्लवी हिनेही या चित्रपटासाठी चांगली फी घेतली आहे. एका भागासाठी ६ कोटी रुपये घेतल्याचे वृत्त असून, दोन्ही भागांसाठी तिचे मानधन १२ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
हनुमंताच्या दमदार भूमिकेत सनी देओल दिसणार असून, त्याने एका भागासाठी २० कोटी रुपये फी घेतली आहे. त्यामुळे दोन्ही भागांसाठी त्याचे मानधन ४० कोटी रुपये इतके होते. त्याच्या भूमिकेबाबतही प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.



