भाजपची यादी जाहीर : रावेरातून रक्षा खडसे यांना उमेदवारी


जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात रावेर मतदारसंघासाठी खासदार रक्षाताई खडसे यांना तिकिट देण्यात आले आहे.

भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याआधी मोठ्या प्रमाणात मंथन करण्यात आले. यासाठी १९, १९ आणि २१ मार्च रोजी भाजपच्या संसदीय मंडळाच्या प्रदीर्घ बैठका झाल्या. यात नावांवर शिक्कामोर्तब करून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.भाजपच्या निवडणूक समितीचे केंद्रीय सचिव जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. त्यांनी एकूण १८२ उमेदवारांची यादी जाहीर केली. मोदी हे वाराणसीतून तर अमित शाह हे गांधीनगरमधून निवडणूक लढविणार आहेत. दरम्यान, भाजपच्या यादीयामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना पक्षातर्फे पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. मध्यंतरी रक्षाताईंचे तिकिट कापले जाणार असल्याची चर्चा रंगली असतांना पक्षाने मात्र त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्‍वास टाकल्याचे दिसून येत आहे. तर या यादीत जळगाव मतदारसंघाबाबत मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही. जळगावच्या उमेदवाराचे नाव दुसर्‍या टप्प्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपने धुळ्यातून केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे तर नंदुरबारमधून डॉ. हीना गावित यांना तिकिट जाहीर केले आहे.

Add Comment

Protected Content