नवी दिल्ली वृत्तसंस्था | काल झालेल्या भीषण अपघातात लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यासह १३ जणांच्या मृत्यूने देश शोकसागरात बुडाला असतांना आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेचा घटनाक्रम सांगितला.
सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या घटनेसंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत माहिती दिली. प्रारंभी त्यांनी रावत यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. सिंग म्हणाले, जनरल बिपीन रावत हे वेलिंगटन येथे आर्मी कॅडेटना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या नियोजित दौर्यानुसार जात होते. हे हेलिकॉप्टर १२.१५ मिनिटांनी कुन्नूर येथे लँड होणार होते. मात्र, तसे झाले नाही. काही वेळातच हेलिकॉप्टरचा यंत्रणेशी संपर्क तुटला.
त्यानंतर काही वेळात कुन्नूरजवळील जंगलात मोठा स्फोटाचा आवाज झाला. प्राप्त माहितीनुसार १३ जणांचा यात मृत्यू झाला. दुर्दैवाने यात जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा यामध्ये समावेश आहे. या अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे गंभीर जखमी असून त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम होण्यासाठी वैद्यकीय पथक शर्थीचे प्रयत्न करत आहे.
रावत यांच्यासोबत त्यांचा पर्सनल स्टाफ आणि अन्य अधिकारी मृत्यूमुखी पडले. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमली आहे. एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी घटनास्थळी गेले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही शोकसंदेश वाचून दाखवत श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर लोकसभेत श्रद्धांजली अर्पण केली.