नाशिक प्रतिनिधी | सध्या राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी संप करणार्या एस. टी. कर्मचार्यांना आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संपूर्ण पाठींबा दर्शविला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत वक्तव्य करण्याची मागणी देखील त्यांनी केली.
नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना राज ठाकरे यांनी एस. टी. कर्मचार्यांना पाठींबा दर्शविला. चार-चार महिने पगाराशिवाय राहणार्या एसटी कर्मचार्यांना मेस्मासारखी अरेरावाची भाषा योग्य नाही. जोपर्यंत एसटीतला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोपर्यंत कर्मचार्यांची परिस्थिती सुधारणार नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात अधिकृत बोलावे, अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, सगळ्या संघटना बाजूला सारून हा संप सुरू आहे. लोकांसाठी राज्य असते. त्यांच्याशी अरेरावीची, कायद्याची भाषा बोलू नये. कर्मचार्यांच्या मागण्या, प्रश्न समजावून घ्या. त्यांचे चार-चार महिने पगार नाहीत. दिवाळी पगाराविना गेली. अशात तुम्ही अरेरावीची भाषा करता. हे योग्य नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बोलावे, असे आवाहन त्यांनी केले. शिवाय खासगीकरण करण्याऐवजी एखादी मॅनेजमेंट कंपनी काढा. इकडे मात्र, तुम्ही एकही पाऊल उचल नाही. त्यांना वार्यावर सोडून देऊन अरेरावाची भाषा करणे योग्य नाही. एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल, असा प्रश्न राज यांनी विचारला. जोपर्यंत एसटीतला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोपर्यंत कर्मचार्यांची परिस्थिती सुधारणार नाही असेही राज ठाकरे याप्रसंगी म्हणाले.