उध्दव ठाकरेंवर आंदोलनाची एक केस तरी आहे का ? : राज यांचा सवाल

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्या येथे आपल्याला होणारा विरोध हा ट्रॅप असल्याचे लक्षात आल्याने आपण तेथे जाणे टाळले असल्याचे नमूद करत भोंग्यांच्या विरोधातील आंदोलन सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. आज पुण्यातील सभेत ते बोलत होते. तर उध्दव ठाकरे यांच्यावर आंदोलनाची एक केस तरी आहे का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांच्या पुण्यात होणार्‍या आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात ते अनेक विषयांवर भाष्य करण्याची शक्यता होती. आणि झालेदेखील तसेच. त्यांनी सभेच्या प्रारंभीच शरद पवार यांना टोला मारला. सध्या निवडणूक नसल्याने भिजता कामा नये असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ते म्हणाले की, राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतो, असं म्हणतात. पण, मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं. टोल नाक्यापासून सर्वच आंदोलन यशस्वी झाले. तुमच्या अंगावर एकतरी आंदोलन केल्याचा गुन्हा आहे का? हे उद्धव ठाकरेंनी सांगावं. भूमिका कुठलीच घ्यायची नाही. संभाजीनगरचं नामकरण झालं की नाही असं म्हणतात. मी आहे असं सांगतात. पण तू कोण आहे ? वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी? अशी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत इतका राडा झाला. त्यानंतर संजय राऊत आणि रवी राणा हे लेहमध्ये जेवण करताना दिसले. मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्यासाठी आलेल्यांसोबत तुम्ही फिरताय. हे सर्व ढोंगी आहेत. यांचं हिंदूत्व फक्त बोलण्यापुरतं आहे. त्यादिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा लावलाय? यांचं हिंदूत्व खोटं आणि आमचं खरं असं सांगतात. याप्रसंगी त्यांनी भाजपवरही टीका केली. ते म्हणाले की, गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाची व्यक्त आहे. त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना मारलं होतं. त्यांना गुजरातमधून हाकलण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

या सभेत राज ठाकरे यांनी अयोध्या दौर्‍यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, मी अयोध्येच्या दौर्‍यावर जाणार होतो. यात भगवान श्रीरामाच्या दर्शनासह कारसेवकांना ठार करून शरयू नदीत मृतदेह सोडले होते. त्या ठिकाणाचं देखील दर्शन मला घ्यायचं होतं. पण, राजकारणात अनेकांना भावना समजत नाही. अयोध्येत काही झालं असतं तर आपले कार्यकर्ते त्यांच्यावर धावून गेले असते. तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला तुरुंगात टाकलं असतं. आपल्या कार्यकर्त्यांची मला काळजी आहे. यामुळे आपण जाणे टाळले असल्याते ते म्हणाले. . माझ्या अयोध्या दौर्‍याच्या घोषणेनंतर ज्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या तो एक ट्रॅप होता. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आली. अयोध्या वारी खुपणार्‍यांनी हे काम केलं आहे. तर, पायाचं दुखणं वाढलं आहे. कंबरेला त्रास होतो. त्यामुळे येत्या १ जूनला शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Protected Content