‘मोंथा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही पावसाचा इशारा 


नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने चक्रीवादळाचे रूप घेतले असून त्याला ‘मोंथा’ असे नाव देण्यात आले आहे. गेल्या काही तासांपासून हे चक्रीवादळ अधिक तीव्र होत असून हवामान खात्याने त्याबाबत उच्च सतर्कतेचा इशारा दिला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम केवळ आंध्र प्रदेशापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

‘मोंथा’ चक्रीवादळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर तयार झाले असून गेल्या सहा तासांत ते ताशी सुमारे १५ किलोमीटर वेगाने उत्तर-उत्तरपश्चिम दिशेने सरकत आहे. मंगळवारी पहाटे ५.३० वाजता या चक्रीवादळाने तीव्र रूप धारण केले असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी संध्याकाळपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारी भागावर धडकण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मछलीपट्टणम आणि कलिंगापट्टणम परिसरात या वादळाचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे. आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांना दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पेड्डापल्ली, जयशंकर भूपालपल्ली आणि मुलुगू या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून किनारपट्टीवरील काकीनाडा, कोनसीमा, कृष्णा, बापटला आणि प्रकाशम जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या परिस्थितीवर केंद्र आणि राज्य प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांना पूरप्रवण भागांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नायडू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली आहे.

‘मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. पुढील काही तासांत पुणे, मुंबई, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भात विशेषतः जोरदार पावसाची शक्यता असून, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अरबी समुद्रात आधीच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकण आणि घाटमाथा परिसरात वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत. त्यामुळे राज्यभरात पावसाचे प्रमाण आणखी काही दिवस टिकून राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. २८ आणि २९ ऑक्टोबरनंतर या चक्रीवादळाचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज आहे.