
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एका महिला प्रवाशाचा दुर्दैवी अंत झाला. अमळनेर आगाराची बस जळगावकडून भुसावळकडे जात असताना हा अपघात झाला.
प्राप्त माहितीनुसार, बस नशिराबाद टोल नाक्याजवळून जात असताना अचानक बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर भरधाव वेगात फुटले. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरकटलेली बस थेट टोल नाक्याजवळील एका भिंतीवर जाऊन आदळली.
या अपघाताच्या धक्क्याने बसमध्ये बसलेली एक महिला प्रवासी खिडकीतून बाहेर फेकली गेली. दुर्दैवाने, ती महिला बसच्या मागील चाकाखाली आली आणि चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. साराबाई गणेश भोई (वय ४६) रा. पाडळसा ता.यावल असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि टोल नाक्याजवळील वाहनधारकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदत कार्य आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या दुर्दैवी घटनेमुळे नशिराबाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



