रायपूर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर येथे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देत शिक्षणासोबत आनंददायी अनुभव देण्याच्या उद्देशाने मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘रेन डे’ (ऋतू महोत्सव) अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांमधून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पावसाचा आनंद मनमुराद लुटला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि उत्साहाने संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम पाण्याचे तळे तयार करण्यात आले होते. या तळ्यात मुलांनी स्वतः बनवलेल्या कागदी नाव सोडत पावसाळ्यातील पारंपरिक खेळाचा आनंद घेतला. नाव पाण्यावर तरंगताना पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आणि त्यांनी हा अनुभव मनसोक्त एन्जॉय केला. रेन डे निमित्त विद्यार्थ्यांनी घरातून विविध आकर्षक हस्तकला साहित्य तयार करून आणले होते. कागदी नावे, रंगीबेरंगी छत्र्या, ढग, बेडूक, मासे तसेच पावसाळ्यावर आधारित विविध कलाकृतींचे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि सर्जनशीलतेचे सर्वांनी भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमातील आणखी एक आकर्षण म्हणजे पावसाळी गीतांवर सादर करण्यात आलेला नृत्याविष्कार. ‘धमाल पाऊस’ आणि इतर पावसाळी गीतांच्या तालावर चिमुकल्यांनी पावसात भिजत मनसोक्त नृत्य केले. बालपणाचा निरागस आनंद आणि उत्साह या क्षणी सर्वांना अनुभवायला मिळाला. पालक आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाला दाद दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकवृंदाने नियोजनबद्ध पद्धतीने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात शिकण्याची संधी मिळावी, यासाठी प्रत्येक उपक्रमाचे बारकाईने नियोजन करण्यात आले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार आणि संस्मरणीय ठरला.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बालमनाला आनंद मिळण्याबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. सर्जनशीलता, आत्मविश्वास, सहभागाची भावना आणि समूहात कार्य करण्याची सवय अशा अनेक गुणांचा विकास या माध्यमातून होत असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘रेन डे’ हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि त्यांच्या बालपणातील अविस्मरणीय आठवणींमध्ये भर घालणारा आनंदोत्सव ठरला.



