जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बदलते हवामान, वाढते तापमान आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित होत असताना दावत-ए-इस्लामी इंडिया यांच्या सामाजिक विभाग GNRF (गरीब नवाज वेलफेअर फाउंडेशन) तर्फे नसीराबाद येथील के.एस.टी. उर्दू हायस्कूलमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिक्षक, विद्यार्थी आणि स्वयंसेवकांच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
दावत-ए-इस्लामी इंडिया यांच्या वतीने दरवर्षी देशभर विशेष वृक्षारोपण अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत GNRF च्या स्वयंसेवकांनी भारतभर लाखो वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्याच अभियानाचा भाग म्हणून नसीराबाद येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात के.एस.टी. उर्दू हायस्कूलचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी वृक्षांचे महत्त्वही यावेळी समजावून सांगण्यात आले.

यावेळी दावत-ए-इस्लामी इंडिया, जळगाव जिल्हाध्यक्ष झुबैर अत्तारी यांनी नागरिकांना अधिकाधिक झाडे लावण्याचे आणि त्यांचे नियमित संगोपन करण्याचे आवाहन केले. “आज लावलेले प्रत्येक झाड हे उद्याच्या पिढीसाठी स्वच्छ हवा, हिरवेगार वातावरण आणि निरोगी जीवनाची शाश्वती देणारे आहे. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अब्दुल बासित अत्तारी, डॉ. अजीम शकील कुरेशी, वसीम कुरेशी सर, मोईज सर, आरिफ सर, झाहिद सर, कुरेशी आसिफ सर, फारूक सर तसेच GNRF चे जिल्हाध्यक्ष रफीक रोशन यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे वृक्षारोपण उपक्रम यशस्वीपणे पार पडला.



