नवी दिल्ली प्रतिनिधी । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. दोन राज्यांतील निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी बँकॉकला निघून गेले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसवरील नाराजीतून राहुल गांधींनी ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येत्या 21 ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्र राज्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात असल्यामुळे दिल्लीतील दिग्गज नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणे साहजिक मानले जात होते. एकीकडे शिवसेनेचे ‘युवराज’ आदित्य ठाकरे मैदानात उतरलेले असताना काँग्रेस ‘युवराज’ मात्र माघारी परतले आहेत.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या 20 रॅली महाराष्ट्रात आयोजित करण्यात आल्या होत्या. विदर्भ, मराठवाडा, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव अशा वेगवेगळ्या पाच भागांमध्ये राहुल गांधी यांची सभा होणार असल्याचे वृत्त होते. मात्र अचानक राहुल गांधींनी प्रचारसभा न घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघातून झालेला पराभव जिव्हारी लागलेले राहुल गांधी या निवडणुकीपासून विजनवासात गेले होते. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी काँग्रेस आपली हुकूमाची पानं बाहेर काढण्याची शक्यता होती, मात्र राहुल गांधींनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.