Home उद्योग भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषण अहवालांवर प्रश्नचिन्ह ; त्रयस्थ संस्थेकडून सत्यापनाची नागरिकांची...

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषण अहवालांवर प्रश्नचिन्ह ; त्रयस्थ संस्थेकडून सत्यापनाची नागरिकांची मागणी

0
10


दीपनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातून होणाऱ्या हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणाच्या मोजमाप अहवालांबाबत परिसरातील नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून, या अहवालांची त्रयस्थ संस्थेमार्फत पडताळणी (सत्यापन) करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कामांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी स्वतंत्र संस्थेकडून अहवालांची तुलना आणि तपासणी करणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विभागांकडून हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी खाजगी संस्थांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या संस्थांकडे नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरी (NABL) मान्यताप्राप्त प्रयोगशाळा असणे आवश्यक असते. मात्र, गेल्या २० ते २५ वर्षांचा आढावा घेतल्यास प्रदूषणाशी संबंधित कामे काही ठराविक खाजगी संस्थांकडेच असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे या संस्थांमध्ये परस्पर संबंध असल्याची आणि त्या केवळ कागदोपत्री वेगवेगळ्या असल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ई-निविदा प्रक्रियेमध्ये अपेक्षित स्पर्धा दिसून येत नसल्याचा आरोप होत असून, काही संस्थांची या कामांमध्ये मक्तेदारी निर्माण झाल्याची भावना परिसरातील नागरिकांमध्ये आहे. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रामुळे बाधित होणाऱ्या आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. हवेतील राख मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या घरांवर तसेच शेतातील पिकांवर साचत असल्याच्या तक्रारी आहेत. परिसरातील नागरिकांना अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ नैसर्गिक वातावरणात ठेवतानाही अडचणी येत असल्याचे सांगण्यात येते.

या परिस्थितीमुळे प्रदूषण मोजणी करणाऱ्या खाजगी संस्थांच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. संबंधित संस्था हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप करून जे अहवाल सादर करतात, त्या अहवालांच्या अचूकतेबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधींनी प्रदूषण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली असता, प्रदूषणाशी संबंधित खाजगी संस्थांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालांचे आजपर्यंत कोणत्याही स्वतंत्र त्रयस्थ खाजगी संस्थेकडून सत्यापन करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली.

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी त्रयस्थ संस्थेकडून अहवालांची तपासणी, तुलना आणि सत्यापन करणे गरजेचे असल्याची मागणी आता पुढे येत आहे. तसेच प्रदूषणाशी संबंधित सर्व कामांची सखोल चौकशी केल्यास अनेक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रदूषणाचा विषय हा नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी थेट संबंधित असल्याने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विराज चौधरी हे या विषयाकडे विशेष लक्ष देतील का आणि पारदर्शकतेसाठी कोणती पावले उचलतील, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound