Home क्राईम चाळीसगाव शहरात पोलिसांकडून मध्यरात्री ८० गुन्हेगारांची झाडाझडती

चाळीसगाव शहरात पोलिसांकडून मध्यरात्री ८० गुन्हेगारांची झाडाझडती

0
9


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहर पोलीस हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. दिनांक २४ जून २०२६ रोजी पहाटे २ ते ४ वाजेच्या दरम्यान झालेल्या या विशेष मोहिमेत पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत विविध प्रकारची कारवाई केली.

या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी रेकॉर्डवरील एकूण ८० आरोपी आणि गुन्हेगारांची तपासणी केली. यावेळी संशयितांच्या घरांची झडती (हाऊस सर्च) घेण्यात आली. तपासणीअंती ८० पैकी ४४ आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

या कारवाईत शस्त्र कायद्यानुसार (आर्म ॲक्ट) दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम १२४ अंतर्गत तीन आलिशान वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये व्हॅगनार (क्रमांक MH 20 EJ 4890), ऑडी (क्रमांक MH 14 EP 7358) आणि व्हर्ना (क्रमांक MH 43 AR 3409) या तीन वाहनांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे ३९ लाख रुपये आहे.

पोलिसांनी या मोहिमेदरम्यान न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित ८ पकड वॉरंटची बजावणी केली. तसेच अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात कारवाई करत प्रोहिबिशन कायद्यानुसार तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून तयार करण्यात आलेले कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. याशिवाय तीन व्यक्तींना समन्स बजावण्यात आले. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये धाक निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने अशा मोहिमा राबविण्यात येणार आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव भाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, ६० पोलीस अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) पथके तसेच तीन आरसीपी (RCP) पथकांचा सहभाग होता. चाळीसगाव शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर तपासणी आणि कारवाई करण्यात आली. ८० गुन्हेगारांची तपासणी, वाहन जप्ती, शस्त्र कायद्यानुसार गुन्हे आणि अवैध धंद्यांवर कारवाईमुळे पोलिसांच्या सतर्कतेचा प्रत्यय आला.


Protected Content

Play sound