चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने पोलीसांच्या मदतीने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बोढरे येथे विना मास्क फिरणाऱ्या आठ जणांवर ग्रामपंचायतीच्या कर्मचारी यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
तालुक्यातील बोढरे गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बांधीत रूग्णांची संख्या ही वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर ग्रामपंचायतीने चार दिवसांसाठी गावात कठोर निर्बंध लागू केले आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. शासकीय ग्रामपंचायतीच्या आवारात आज विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण आठ जणांवर यावेळी कारवाई करण्यात आली. प्रत्येकी शंभर रूपये प्रमाणे दंड ठोठावण्यात आले. यातून एकूण ८०० रूपये महसूल ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे. कारवाईचा पहिलाच दिवस असल्याने शंभर रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आले आहे. लागलीच दुसऱ्या दिवसापासून ५०० रूपये दंड आकारण्यात येईल असा सुतोवाच ग्रामसेवक एस.एस.पाटोळे बरोबर सरपंच गुलाब राठोड यांनी केले आहे. सरपंच गुलाब राठोड व उपसरपंच अर्जून राठोड यांनी घरोघरी जाऊन मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करत आहे. कारवाई दरम्यान पोलिस पाटील राजेंद्र परदेशी, सरपंच गुलाब राठोड, उपसरपंच अर्जून राठोड, सदस्य एकनाथ, ग्रामपंचायत कर्मचारी महेश चव्हाण, वसंत चव्हाण व निवृत्ती राठोड आदींनी कारवाई केली.