
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक डास दिनानिमित्त मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डासांमुळे होणारे विविध आजार, त्यांचा प्रसार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. टी. चौधरी यांनी जागतिक डास दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. डासांची उत्पत्ती, जीवनचक्र तसेच डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांची माहिती देताना रोगप्रतिबंधासाठी जनजागृती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. एस. डी. चाटे यांनी मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि हत्तीरोग यांसारख्या डासजन्य आजारांबाबत मार्गदर्शन केले. डासांच्या माध्यमातून रोगजंतूंचा प्रसार कशा प्रकारे होतो, तसेच आजारांपासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
डॉ. एस. के. थोरात यांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घर व परिसरात पाणी साचू न देणे, नियमित स्वच्छता राखणे, डास प्रतिबंधक साधनांचा योग्य वापर करणे आणि मच्छरदाणीचा वापर करण्याचे आवाहन केले. डासजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बी.एस्सी. प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थी यश रवाये, जया गुरचल आणि सानिया तडवी यांनी जागतिक डास दिन, डासजन्य आजार आणि त्यांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर आपले विचार मांडले. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरासह परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राणीशास्त्र विभागाचे प्रयोगशाळा परिचर अशोक पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. “डासांची उत्पत्ती रोखा, डासजन्य आजारांना आळा घाला आणि निरोगी समाज घडवा” हा जनजागृतीपर संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे आणि डॉ. वंदना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक, प्रयोगशाळा कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
जागतिक डास दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून डासजन्य आजार रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेसोबतच परिसर स्वच्छ ठेवणे आणि पाणी साचू न देणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.



