जे.टी.महाजन इंजिनिअरींग कॉलेजात मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत जनजागृती !

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फैजूपर येथील जे.टी.महाजन इंजिनीअरिंग कॉलेज येथे मतदान जनजागृती करण्यात आली यासोबत नवमतदारांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना मतदार शपथ देऊन देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करून निर्भयपणे मतदान करण्याचे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मतदान जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदानाचा समान हक्क प्रदान केला आहे. प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपला वाटा उचलायला हवा. त्याप्रमाणेच मतदानाबाबत लोकांच्या मनात कर्तव्य भावना निर्माण व्हावी या हेतूने महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी. पाटील यांनी मांडले.

याप्रसंगी उपस्थित 250 ते 300 विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना मतदार शपथ देऊन देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करून निर्भयपणे मतदान करण्याचे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली. त्यानंतर “देशहिताचे ठेवून भान, चला करू मतदान!”,”उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा..”,”मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो”,”आपले मत आपले भविष्य”,”करा आपल्या मताचे दान हीच आहे लोकशाहीची शान” अशा घोषणा देण्यात आल्या. त्यासोबत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोकशाहीत मतदानाला असलेले महत्त्व सर्वांना समजावे आणि प्रत्येकाने मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे मत उपप्राचार्य डॉ.जी.ई.चौधरी यांनी व्यक्त केले. शिवाय महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी आपले मित्र, मैत्रिणी शेजारी व आपले आई-वडिलांसह इतर नातेवाईक असे किमान दहा मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करून मतदान केंद्रावर घेऊन जाण्याचा संकल्प घेतला आहे.

यावेळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ आर.डी.पाटील, प्र.प्राचार्य डॉ.के.जी.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.ई.चौधरी, डीन डॉ.पी.एम महाजन, तसेच सर्व विभाग प्रमुख डॉ ए.एम.पाटील, डॉ डी.ए.वारके , प्रा. डी.आर.पाचपांडे, प्रा.एल.डी.चौधरी, प्रा. वाय.आर.भोळे, प्रा मोहिनी चौधरी उपस्थित होते.

Protected Content