बियाणे उपलब्ध करा, अन्यथा आंदोलन : आ. चंद्रकांत पाटलांचा इशारा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कृषि विभागाकडून बियाणे उपलब्ध करण्यात आल्याचा दावा फोल ठरत असून कपाशी बियाण्यांची जादा दराने अवैधरित्या विक्री करून शेतकर्‍यांची सुरु असलेली आर्थिक लूट तात्काळ थांबविण्यात यावी अन्यथा शेतकर्‍यांसह आंदोलन करण्याचा इशारा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यासह माझ्या मतदार संघातील शेतकरी खरिप हंगामाच्या तयारीला लागलेले असून बाजारात बियाणेदेखील उपलब्ध होत असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून राशी सीड्स ५६९, न्युझीविडू सीड्स, अंकुर सीड्स अंकुर स्वदेशी ५, तुलसी सीड्स, अजित सीड्स, कृषिधन सीड्स, कावेरी सीड्स व इतर कंपन्यांची त्यांच्या जमिनीच्या पोत प्रमाणे उत्पन्न देणारी कपाशी बियाण्यांची मागणी असते आणि या अनुषंगाने कृषी विभागाकडून १० लाख पाकिटांची उपलब्धता करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सदरील बियाण्यांची कुत्रिम लिंकिंग करण्यात येवून प्रति ८५०/- रुपयांच्या बियाण्याच्या पाकिटाची तब्बल १५००/- ते २०००/- रुपयांमध्ये अवैधरीत्या विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकरी बांधवांकडून माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. आधीच अस्मानी व तुफानी संकटांनी हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांच्या सर्रासपणे सुरु असलेल्या लुटीचा प्रकार संतापजनक आहे. तरी याप्रकरणी तात्काळ सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा मला शेतकर्‍यांसह आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा अधीक्षक कृषी विभाग जळगाव जि. जळगाव यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

Protected Content