जावे आठवणींच्या गावा ! : दोन दशकांनी जमला वर्गमित्रांचा गोतावळा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तब्बल २० वर्षांनी एकत्र आलेल्या अंतुर्ली येथील वर्गमित्रांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून देत पुन्हा एकत्र येण्याचा निर्धार केला. याला निमित्त ठरले ते स्नेहसंमेलनाचे !

(Image Credit Source: Live Trends News)

या संदर्भातील वृत्त असे की, अंतुर्ली येथील जिल्हा परिषद शाळा व मि. फ. तराळ विद्यालय एम. आर. महाजन ज्युनिअर कॉलेज येथे एकत्रीतपणे शिकलेल्या विद्यार्थी मित्रांचे स्नेहसंमेलन नुकतेच महाबळेश्‍वरला आयोजीत करण्यात आले. मूळचे अंतुर्लीकर तसेच सध्या वाई येथे स्थायीक झालेले विनोद वानखेडे यांनी हा योग जुळवून आणला. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सोबत शिकलेल्या वर्गमित्रांना शोधून त्यांचा व्हाटसअप ग्रुप तयार केला. यात स्नेहसंमेलनाची संकल्पना मांडण्यात आली. हीच संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली.

अंतुर्ली येथील हे सर्व मित्र 2003-04 साली बारावीच्या वर्गाला शिकण्यासाठी होते. यानंतर अपवाद वगळता सर्व जण नोकरी वा व्यवसायानिमित्त ठिकठिकाण विखुरले गेले. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सर्व मित्र २० वर्षांनी भेटले तेव्हा काय बोलू आणि काय नको अशी सर्वांची अवस्था झाली होती. सर्व जण त्या भारावलेल्या काळात हरवून गेले. गप्पा-गोष्टी झाल्या, एकमेकांची माहिती जाणून घेण्यात आली. आपले गाव, शाळा, कॉलेज, शिक्षक अशा अनेक विषयांवर मनमुराद व रसाळ चर्चा झाल्या. यात गाणी, गीत, संगीत हे देखील आलेच.

या स्नेहसंमेलनात सहभागी झालेल्या प्रत्येक वर्गमित्राला स्मृतीचिन्हाने सन्मानीत करण्यात आले. विनोद वानखेडे यांनी अतिशय अचूकपणे याचे आयोजन केले. यानंतर सर्व मित्रांनी आपापल्या कुटुंबियांसह स्नेहसंमेलन घ्यावे असे नियोजन करत सर्व वर्गमित्रांनी हुरहुरत्या मनाने निरोप घेतला.

Protected Content