लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर केला पाच महिने अत्याचार – तरुणावर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील ३१ वर्षीय तरुणाने नर्सला लग्नाचे आमिष दाखवत पाच महिने अत्याचार केला; मात्र नंतर लग्नास नकार दिल्याने नर्सने फैजपूर शहर पोलीस स्टेशन धाव घेतली. या प्रकरणी संशयित आरोपी भूषण संजयराव तायडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने वर्ग झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “अमरावती शहरातील ३१ वर्षीय तरुणी एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीला आहे. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘हॅलो यू’ ॲपच्या माध्यमातून तरुणीची ‘मुक्ताईनगर’ येथील भूषण संजयराव तायडे याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि मैत्रीनंतर प्रेमात रूपांतर झाले. याचा गैरफायदा घेत भूषण तायडे याने तरुणीला २३ एप्रिल २०२१ रोजी गाडी पाठवून मुक्ताईनगरात बोलावून घेतले.

एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी नेऊन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडीत तरुणीसोबत भूषण तायडे हा त्याच्या घरी आला असता त्याच्या घरच्यांनी लग्नास विरोध केला. यामुळे भूषण तायडे आणि पीडित तरुणी हे अमरावती येथे २४ एप्रिल ते ८ सप्टेंबर २०२१ दरम्यान एकाच ठिकाणी राहू लागले. या कालावधीत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत शारीरीक संबंध प्रस्थापित करण्यात आले. तरुणीने लग्नासंदर्भात विचारले असता कागदपत्रांचा बहाणा करीत गोष्ट टाळली. त्यानंतर अचानक भूषण तायडे हा तरुणीला काहीही न सांगता ८ सप्टेंबर रोजी रात्री घरातून निघून गेला. दरम्यान पीडिता ही भूषण तायडे याच्या घरी गेली असता भूषणच्या आई-वडीलांनी पिडीतेला शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली.”

मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा वर्ग

याप्रकरणी तरुणीने अमरावती शहरातील फैजपूर शहर पोलीस स्टेशनला धाव घेऊन संशयित आरोपी भूषण संजयराव तायडे याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने वर्ग झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहेत.

Protected Content