Home क्राईम रावेर तालुक्यात शेतातील मोटार पंप चोरणारी टोळी जेरबंद ; ४ आरोपी अटकेत

रावेर तालुक्यात शेतातील मोटार पंप चोरणारी टोळी जेरबंद ; ४ आरोपी अटकेत

0
17

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील रमजीपूर येथील शेतातून चोरलेली पाण्याची विद्युत मोटार विकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या मुसक्या आवळण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शेतातील मोटार व कॉपर वायर चोरीच्या घटना रोखण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही दिवसांत आरोपींचा शोध घेऊन चोरीचा माल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी रमजीपूर येथील शेतकरी मोहन लालचंद कावडकर यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या शेत गट क्रमांक १६२२/२ मधून ३ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरांनी ५ एचपी क्षमतेची ‘समुराई’ कंपनीची पाण्याची विद्युत मोटार चोरून नेली होती. या चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर गुन्हे शोध पथक आणि बीट अंमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.

तपास सुरु असताना गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, रमजीपूर गावातीलच काही संशयित इसम चोरीची मोटार विक्री करण्यासाठी आणणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून राजेंद्र सुधाकर महाजन (वय ३०), उमेश प्रकाश धनगर (वय २३), रितेश जगन्नाथ कावडकर (वय २३) आणि  आनंदा गोपाळ धनगर (वय २८, सर्व रा. रमजीपूर, ता. रावेर) यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या खाकीचा दाखवताच त्यांनी चोरीची कबुली देत लपवून ठेवलेला मोटार पंप पोलिसांच्या हवाली केला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असून त्यांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. या आरोपींनी अशाच प्रकारे आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत का, यात अन्य कोणी साथीदार आहेत का, याचा सखोल तपास बीट अंमलदार सिकंदर तडवी करत आहेत.

दरम्यान, रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरात किंवा ग्रामीण भागात जुनी मोटार, कॉपर वायर अथवा विद्युत पंप विक्री किंवा खरेदी करणाऱ्या संशयास्पद व्यक्तींबद्दल काही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा; माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संदीप पाटील, सपोनि अमूल बच्छाव, पोहेकॉ सिकंदर तडवी, पोकॉ योगेश पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी आणि विकार शेख यांच्या पथकाने केली आहे.


Protected Content

Play sound