Home धर्म-समाज मनुदेवी नवरात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज ; भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आज नियोजन बैठक

मनुदेवी नवरात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज ; भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आज नियोजन बैठक

0
13

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी येथे नवरात्रोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये, तसेच नवरात्रोत्सव काळात वाहतूक, सुरक्षा, एसटी बससेवा, वनविभाग आणि इतर आवश्यक सुविधांचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिराच्या सभागृहात होणार आहे. नवरात्रोत्सव काळात मनुदेवी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, भाविकांच्या सुरक्षिततेसह विविध बाबींवर बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीस यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल एसटी आगार व्यवस्थापक इमरान पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअधिकारी जहाँगीर तडवी, पश्चिम वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी, पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर तसेच यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय श्री मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व विश्वस्त, संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने बैठकीत नियोजन करण्यात येणार आहे.

मनुदेवी हे यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. नवरात्रोत्सवात सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या देवस्थानावर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होतात. त्यामुळे संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने पूर्वतयारीला सुरुवात केली असून, विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यावर बैठकीत भर दिला जाणार आहे. भाविकांची सुरक्षितता, वाहतुकीची सुरळीत व्यवस्था आणि दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व संबंधितांनी बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन श्री मनुदेवी संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound